‘हा’ अभिनेता ठरला गुगल ट्रेंडमध्ये अव्वल
मुंबई :- भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन काळात लाखो मजूर आपल्या घरापासून दूर परराज्यात अडकून पडले आहेत. अशा मजुरांची मूळगावी परतण्यासाठी जीवापाड धडपड सुरू आहे. त्यांना घरी पोहचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतेच आहे. मात्र या कार्यात बॉलिवूडचा एक सेलिब्रिटीही मजुरांच्या मदतीला धावून आला आहे. खरं तर हा बॉलिवूडचा हिरो नाही तर खलनायक आहे. त्याचं नाव आहे ‘सोनू सूद’. सोनू हजारो स्थलांतरितांसाठी बसेसची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. त्यामुळे पडद्यावर ‘खलनायक असला तरी खऱ्या आयुष्यातला तो हिरो आहे’ अशा शब्दांत सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

सोनू सध्या गुगल ट्रेंडमध्येदेखील आघाडीवर असून त्याने आजच्या आघाडीच्या सगळ्या कलाकारांना गुगलवर मात दिली आहे. बॉलिवूडवर आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तीन खानांचे राज्य असल्याचे म्हटले जाते. पण गुगल ट्रे्ंडवर सध्या सोनू सूदची चलती आहे. त्याच्याआधी गुगल ट्रेंडमध्ये अक्षयकुमार अव्वल होता. पण त्याने अक्षयलादेखील मागे टाकले आहे. केवळ मुंबई, दिल्ली यासारख्या शहरांतच नव्हे तर छोट्या छोट्या शहरातील लोकदेखील सोनूविषयी गुगलवर सर्च करत आहेत.
सोनूचे मूळ गाव कोणते काय आहे, त्याने आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याने दिलेला टोल फ्री नंबर, तो लोकांना करत असलेली मदत अशा विविध गोष्टी लोक सध्या गुगलवर सर्च करत आहेत.


