मान्सून ११ जूनला मुंबईत बरसणार
मुंबई : मोसमी वारे येत्या दोन ते तीन दिवसात कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ११ जून रोजी मुंबईत मान्सूनच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्यामुळे सहा राज्यात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे आगमन लांबेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मान्सूनच्या वाऱ्यांच्या प्रवाहांच्या अनुकूल वातावरणामुळे मान्सून नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला केरळमध्ये दाखल झाला. तमीळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागापर्यंत मजल मारली होती. आता आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार तळकोकण मार्गे ११ जून रोजी मान्सून मुंबईत बरसेल.
हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून पूर्वसरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पाऊस सुरू आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वत्र गारवा पसरला आहे. तपमान कमी झाले आहे.
मोसमी वारे सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झालेआले आहेत. गेल्या दोन दिवसात दक्षिण मध्य कर्नाटकाचा काही भाग, तमिळनाडूचा बराचसा भाग आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातील सर्व भागात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तळकोकणातून मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटकातील काही भाग, तमिळनाडूतील उर्वरित भाग, आंध्र प्रदेश, मध्य अरबी समुद्रातील बहुतांश भागात मोसमी वारे दाखल होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

