AgriculturalFarmersMaharashtra Govगावाकडच्या बातम्या

Satyamev Jayate Farmer Cup 2026 : महाराष्ट्रात 5 लाख शेतकऱ्यांना सामूहिक शेतीशी जोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Satyamev Jayate Farmer Cup 2026 : राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि फायदेशीर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून महाराष्ट्रात सामूहिक शेतीची नवी चळवळ उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही वर्षांत राज्यातील तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना ग्रुप फार्मिंगशी जोडण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, या माध्यमातून शेतीमध्ये मोठा बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

18 हजार शेतकरी गट ठरणार कृषी परिवर्तनाचे शिल्पकार
मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्या राज्यातील 18 हजार शेतकरी गट ‘सत्यमेव जयते फार्मर कप’मध्ये सहभागी झाले आहेत. हे गट महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे नेतृत्व करतील आणि त्यांच्या यशातून लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीकडे प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘स्मार्ट शेती’ अ‍ॅपचे लोकार्पण
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘स्मार्ट शेती’ अ‍ॅपचेही लोकार्पण करण्यात आले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, 26 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील 46 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती, मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश आहे.

सामूहिक शेतीमुळे उत्पादनात 71 टक्क्यांपर्यंत वाढ
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, फार्मर कपच्या मागील हंगामात सहभागी झालेल्या शेतकरी गटांनी सोयाबीन, कापूस आणि मका यांसारख्या पिकांच्या उत्पादनात सरासरी 71 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. सामूहिक पद्धतीने कृषी साहित्य खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांनी तब्बल 1,584 कोटी रुपयांची बचत केली. तसेच श्रमदान आणि संसाधनांचा सामायिक वापर केल्यामुळे प्रति एकर सुमारे 6 हजार रुपयांनी शेतीचा खर्च कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

गटशेतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’चा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, फार्मर कप ही केवळ स्पर्धा नसून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण… pic.twitter.com/sLmZPYuOoB— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2026

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख
महिला शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार लवकरच ‘महिला शेतकरी विधेयक’ आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ज्या महिला प्रत्यक्ष शेती करतात, मात्र त्यांच्या नावावर जमीन नाही, अशा महिलांनाही या कायद्याअंतर्गत शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता देण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्रात AI वापरणारे महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य
महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठ्या प्रमाणावर वापरणारे देशातील पहिले राज्य बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. फार्मर कपमधून मिळणारी माहिती ‘महाविस्तार’ अॅपशी जोडली जाणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना अधिक अचूक सल्ला, हवामानविषयक माहिती आणि आधुनिक कृषी सेवा उपलब्ध होणार आहेत. भविष्यातील कृषी धोरणे तयार करतानाही या माहितीचा उपयोग केला जाणार आहे.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणावर भर
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आतापासूनच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आवाहन केले. शेततळी स्वच्छ करणे, गाळ काढणे, पाणीसाठा वाढवणे आणि जलसंधारणाच्या संरचनांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मर कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना स्वतः भेट देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दत्तात्रय भरणे आणि आमिर खान यांचाही उपक्रमाला पाठिंबा
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सामूहिक शेतीमुळे उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे सांगितले. महिला बचत गटांकडून राबविण्यात येणाऱ्या सामूहिक शेतीचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनीही उपस्थित राहून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकरी सक्षम झाला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी मांडले यशस्वी शेतीचे अनुभव
कार्यक्रमादरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी गट, कृषी अधिकारी आणि सल्लागारांनी आपले अनुभव मांडले. सामूहिक शेती, जलसंधारण आणि संसाधनांचा सामायिक वापर यामुळे शेतीचा खर्च कमी झाला, उत्पादन वाढले आणि उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button