एकनाथ खडसे इन ॲक्शन, आज संध्याकाळी करणार मोठा खुलासा
जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर आता आधीची अनेक गुपितं ते एकएक करून बाहेर काढतील असे दिसते. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खडसे कुणाची नावं जाहीर करता हे पाहण्याचे ठरणार आहे.
बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळेच एकनाथ खडसे हे आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
‘या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे’, असा दावा खडसे यांनी रविवारी केला होता. तसंच, ‘बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथं ॲड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असंही खडसे यांनी सांगितले.
राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती, असं सांगत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे.‘या प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशात जर काही माहिती दिली तर चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे आताच नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे’, असंही खडसे यांनी सांगितले.
‘बीएआर संस्थेतील घोटाळा हा हजारो कोटी किंमतीचा असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक शाखेनं कारवाई सुरू केल्यापासून अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर येईल असे तर्कवितर्क लावले जात आहे, त्यातच आता एकनाथ खडसे पुराव्यानिशी नाव जाहीर करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
