राज्यात पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरवणार रॅकेट सक्रिय ; प्रवीण दरेकरांचा आरोप
औरंगाबाद : करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारं दलालांच रॅकेट राज्यात कार्यरत आहेत. भिवंडीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार नुकताच उघडकीस आणला आहे, असा खबळजनक दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. याबाबत सरकारनं याची गंभीर दखल घ्यायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर आज औरंगाबादमध्ये आले होते. वैद्यकीय व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आज विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात करोना संसर्गाच्या साथीची परिस्थिती भयंकर असल्याचा आरोप केला.
राज्यात दलालांची अनेक रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप केला. एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचा याचा निर्णय हे दलाल घेत आहेत. त्यांची रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांशी ‘डील’ झालेली असते. मात्र, हे महाभयंकर प्रकार सरकारला माहीतही नाहीत,’ असं दरेकर म्हणाले. मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत केवळ दुर्लक्ष केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात ऑक्सिजनची यंत्रणा नाही. रुग्णवाहिका नाही आणि व्हेंटिलेटरही नाही, अशी मुंबईची अवस्था आहे,’ असं ते म्हणाले.
‘सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. त्याला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हॉस्पिटलची बिलं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. प्रयोगशाळांवरही सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारात आहेत. सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्याला ते भीक घालत नसल्याचं दिसत आहे. सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. लोकांना खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या बिलाच्या पैशाचा परतावा दिला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली.