महात्मा गांधी स्मारक रूग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमण्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
परळ येथील महात्मा गांधी स्मारक रूग्णालयात कायमस्वरूपी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमावा व या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
विधानभवनात महात्मा गांधी स्मारक रूग्णालय कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या, सोलापूर व जळगाव उपजिल्हा रूग्णालयांचे श्रेणीवर्धन व रिक्त पदे भरणे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार उदय सामंत, आमदार चंद्रकांत सोनावणे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
महात्मा गांधी स्मारक रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक हे पद प्रभारी असल्यामुळे रूग्णालय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यास अडचण निर्माण होत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर येथे कायमस्वरूपी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमावा असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन १०० खाटांवरून २०० खाटांमध्ये करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सदर रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी जागा निश्चित करणे आवश्यक असून यासाठी जागेची पाहणी करण्यात येईल. तसेच येथील निवास स्थानांची व्यवस्था केल्यानंतर रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या रूग्णालयात सी.टी.स्कॅन, डिजिटल एक्स रे मशीन यांसारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्यात यावी. व डायलेसीस यंत्र चालविण्यासाठी २ नवीन तंत्रज्ञाची नेमणूक करण्यात यावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अकलूज उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी चर्चा
बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय अकलूज याचे श्रेणीवर्धन करण्याबात चर्चा करण्यात आली. या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी जागा निश्चित करणे आवश्यक असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. याबाबत नियमितपणे पाठपुरावा करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या. तसेच या रूग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.