इतरगावाकडच्या बातम्याठाणे शहर

ठाणे महानगरपालिका कर्मचारी श्री.गणेशोत्सव मंड़ळाने साकारलेल्या टिटवाळा मंदिराची प्रतिकृती

गणेशोत्सवानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या गणेशोत्सव मंड़ळाने यावर्षी तीर्थक्षेत्र असलेल्या टिटवाळा मंदिराची प्रतिकृती साकारली असून त्यात विराजमान झालेली टिटवाळा महागणपतीची सर्वांगसुंदर मुर्ती येथे भाविकांना पाहावयास मिळत आहे. टिटवाळा मंदिराची ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करत असल्याने सध्या ठाणे महानगरपालिकेत संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.

            ठाणे महानगरपालिका कर्मचारी श्री.गणेशोत्सव मंड़ळाच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून यंदा या मंड़ळाचे 36 वे वर्ष आहे.  यावर्षी मंड़ळाने देखाव्यात टिटवाळा मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारली आहे.  त्यावर प्रकाशझोत टाकल्याने हा देखावा उजळून दिसत आहे. येथे आल्यावर आपण थेट गाभा-यात पोहचतो.

हाकेला धावणारा अशी ओळख असणा-या टिटवाळ्याच्या महागणपतीची हुबेहुब अशी शाड़ूची मुर्ती बसविण्यात आली आहे. शेंदरी रंगाची ही रेखीव मुर्ती आपले लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढ़े आलेली सोंड़ यामुळे मुर्तीला ठसठसीतपणा आला आहे. एकसंघ पाषाणातील ही घड़ीव मूर्ती असून तिला वैशिष्ट्यपूर्ण अशी आध्यात्मिक बैठक आहे.  या आसनस्थ मूर्तीची उंची 3 फूट असून ती चतुर्भूज आहे.  मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मस्तकाच्या मध्यावर खोलगट भागात मणी बसविला आहे. नाभीस्थानीही खोलगट भागात मणी बसविला आहे. नाभी भोवती साड़ेतीन वेटोळे घातलेला सर्प आहे. चौथ-यात पंचमातृका नमस्कार मुद्रेत कोरलेल्या आहेत, त्या जणुकाही पंचमहाभुतांचे प्रतिक वाटते. चौथ-याच्या दोन्ही ड़ाव्या व उजव्या बाजूस दोन मूषक असून त्यांची तोंड़े उर्ध्व आहेत. भुत व भविष्य काळाचे ते प्रतिक आहे असे वाटते. गाभा-यात प्रवेश केल्यापासून महागणपतीची ही मुर्ती आपली नजर खिळवून ठेवते. चांदीचा बारीक कलाकुसर केलेला देवारा, त्यात असलेली केशरी मुर्ती, हिरव्या दुर्वा आणि मोग-याची व जास्वंदाची फुले यामुळे या देखाव्यात सुंदर रंगसंगती साधली जात आहे.

सदर देखाव्याची सजावट ड़ॉ. दिलीप घोलप यांनी केली असून महागणपतीची शाड़ूची मुर्ती मुर्तीकार दिपक गोरे यांनी साकारली आहे. तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांचे या कलाकृतीस विशेष सहाय्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button