कळवा-मुंब्र्यात निविदा घंटागाडीची; कागदोपत्री डंपर व डिलीव्हरी व्हॅन! नारायण पवार यांच्याकडून घनकचरा व्यवस्थापन कंत्राटाचा घोळ उघड
ठाणे (प्रतिनिधी) : कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांऐवजी कागदोपत्री डंपर व डिलीव्हरी व्हॅनची नोंद केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी काल महासभेचे लक्ष वेधले. अखेर या संदर्भात चर्चेसाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात लवकरच बैठक आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या वेबिनार महासभेत अखेर काल गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास झाला. कळवा-मुंब्रा प्रभाग समितीत घनकचरा व्यवस्थापनाचे २०१७ ते २०२२ पर्यंतच्या कंत्राटाबाबत ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये टाटा एसीई व ७०८ एसीई वाहने असलेल्या घंटागाड्यांऐवजी काही गाड्या चक्क डंपर (टीपर) व डीलिव्हरी व्हॅन असल्याचे आरटीओतील कागदपत्रांत आढळले.
त्याचबरोबर नारायण पवार यांच्याकडून बँक सॉलव्हनसीमध्ये आढळलेल्या तफावतीचा मुद्दाही मांडण्यात आला. संबंधित कंत्राटदाराचे काम नांदेड-वाघाळा महापालिकेत कंत्राटदाराचे काम २००६ ला सुरू झाले होते. मात्र, अनुभव प्रमाणपत्रात २००५ चा उल्लेख होता. त्याचबरोबर कचरा उचलण्याचे काम कोणत्या वाहनाद्वारे केले गेले, याबाबत माहिती नव्हती, निविदा रक्कमेच्या ५० टक्के इन्कम टॅक्स टर्नओव्हरची अट होती. मात्र, नारायण पवार यांना सादर केलेल्या कागदपत्रांत संबंधित कंत्राटदाराचा टर्नओव्हर केवळ सात ते आठ लाखांचा आहे. या मुद्द्यांकडे नारायण पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर या प्रश्नावर महापौरांच्या दालनात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली. तसेच या बैठकीत नारायण पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.