रंगकर्मी, साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
मुख्यमंत्र्यांची, ज्येष्ठ रंगकर्मी, मतकरींना आदरांजली
मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत अखरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रत्नाकर मतकरी यांना गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्राच्या साहित्य विश्र्वातील अमुल्य असे एक साहित्य ‘रत्न’ निखळले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे, अशा भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं. इतकंच नाही तर बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली होती. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ ही नाटकं रंगभूमीवर अतिशय गाजली.
त्यांच्या जाण्याने नाट्य आणि साहित्यीक क्षेत्रावर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

