नाशिक
नाशिक विभागातील जलयुक्त शिवाराची ८१ टक्के कामे पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ यावर्षी नाशिक विभागातील ८१ टक्के कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १२ टक्के कामे प्रगतीत असून ६ टक्के कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नाशिक विभागात मान्सूनने अद्याप जोर न धरल्याने जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण करण्यास संधी मिळाली आहे. पेरणी होण्यापूर्वी अधिकाधिक कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्या, असे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जलयुक्त शिवारामध्ये नाशिक विभागातील १ हजार १२३ गावांची निवड झाली असून यात २० हजार ७२ कामांचे उद्दिष्ट्य होते. त्यापैकी १९ हजार ८६६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. विभागात ८१ टक्के म्हणजेच १६ हजार ३२८ कामे पूर्ण करण्यात आली. आणि १ हजार २४७ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत.