एमएसएमई मध्ये सहा कोटी नोकरीच्या संधी : नितीन गडकरी
मुंबई: कोरोना व्हायरसने अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमांचा देशाच्या जीडीपीत ३१ टक्के वाटा आहे. एक्स्पोर्टमध्ये ४७ टक्के वाटा एसएमईचा आहे. आतापर्यंत या सेक्टरमधून १२ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आगामी पाच वर्षात या सेक्टरमधून किमान सहा कोटी कोटी नोकऱ्या निर्माण होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
स्वावलंबन ई समिट 2020 मध्ये ते बोलत होते. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, एमएसएमई उद्योगांतून देशाचा विकास झाला. एसएमई सेक्टर आगामी पाच वर्षात आपला ग्रोथ रेट नक्कीच वाढवेल. किमान तीस टक्के असलेला ग्रोथ रेट पन्नास टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. तर एक्स्पोर्टचा रेट साठ टक्क्यांवर नेण्याचा उद्देश आहे. यातून पाच कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. जे उद्योग नोंदणीकृत आहेत, त्यांना एमएसएमई योजनांचा फायदा घेण्यासाठी मायक्रो इंडस्ट्रीजच्या नियमांनुसार नोंदणीची गरज आहे. यासाठी एनजीओंची मदत घेतली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यातून छोट्या ट्रेडर्सनाही सामावून घेतले जाईल. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी एमएसएमई सेक्टरला वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्या अंतर्गत या सेक्टरला विनातारण तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

