मुंबईकरांच्या सोयीसाठी गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे मार्गावर सुरु करणार रोप – वे सेवा
मुंबई महानगरविकास प्राधिकरणाच्या 148 व्या बैठकीत गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोप – वे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मालाड ते मार्वे आणि गोराई ते बोरिवली या दोन्ही साडेचार कि.मी. लांबीच्या अंतरासाठी रोप – वे प्रकल्प कितपत शक्य आहे हे पाहण्यासाठी मे. इंडियन पोर्ट रेल अँड रोप-वे कॉर्पोरेशन लि. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली.
या बैठकीला गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.
