IRCTC वरून ट्रेनचे तिकीट कसे बुक कराल?
Online Ticket Booking : आजच्या डिजिटल काळात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर लांब रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. भारतीय रेल्वेची अधिकृत IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) वेबसाइट वापरून घरबसल्या काही मिनिटांत ट्रेनचे तिकीट बुक करता येते. वेबसाइटवरून तुम्ही आरक्षित (Reserved), तत्काळ (Tatkal) तसेच विविध श्रेणीतील तिकीट सहज बुक करू शकता. सुरक्षित ऑनलाइन पेमेंट, तत्काळ कन्फर्मेशन आणि ई-तिकीट डाउनलोड करण्याची सुविधा असल्यामुळे लाखो प्रवासी दररोज IRCTC चा वापर करतात.
IRCTC वर खाते अकाउंट तयार करा
सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि Register पर्यायावर क्लिक करा. येथे नवीन खाते तयार करा. यासाठी Username, Password, नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पत्ता यासारखी माहिती भरावी लागते. त्यानंतर मोबाईल आणि ई-मेलवर आलेला OTP टाकून खाते सक्रिय करावे लागते. एकदा खाते तयार झाल्यानंतर Username आणि Password वापरून लॉगिन करता येते. खाते तयार करताना योग्य माहिती भरल्यास भविष्यात तिकीट बुकिंग करताना कोणतीही अडचण येत नाही.
ऑनलाइन ट्रेनचे तिकीट कसे बुक कराल?
लॉगिन केल्यानंतर From आणि To स्टेशन निवडा. त्यानंतर प्रवासाची तारीख निवडून Search Trains वर क्लिक करा. उपलब्ध ट्रेनची यादी दिसल्यानंतर इच्छित ट्रेन, क्लास (Sleeper, 3AC, 2AC, Chair Car इ.) आणि कोटा (General, Tatkal) निवडा. पुढे प्रवाशांची नावे, वय, लिंग, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक असल्यास वरिष्ठ नागरिक किंवा इतर सवलतींची माहिती भरा. सर्व माहिती तपासून Continue Booking वर क्लिक करा. त्यानंतर UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे ऑनलाइन पेमेंट पूर्ण करा.
ई-तिकीट डाउनलोड करताना कोणती काळजी घ्यावी?
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तिकीट लगेचच बुक होते आणि तुमच्या स्क्रीनवर PNR नंबर व ई-तिकीट उपलब्ध होते. हे तिकीट PDF स्वरूपात डाउनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करता येते किंवा प्रिंटही काढता येते. तिकीटाची प्रत ई-मेलवरही पाठवली जाते. प्रवासादरम्यान आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर वैध ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. तिकीट बुक करताना प्रवाशांची नावे आणि तपशील अचूक भरल्याची खात्री करा, कारण चुकीची माहिती असल्यास प्रवासादरम्यान अडचणी निर्माण होऊ शकतात.



