भारतीय शेअर बाजारात आणखी एका ‘मेगा IPO’ची तयारी; कोका-कोला १ अब्ज डॉलर उभारण्याच्या तयारीत
मुंबई : जगातील आघाडीची सॉफ्ट ड्रिंक कंपनी ‘कोका-कोला’ (Coca-Cola) भारताच्या मजबूत शेअर बाजारात मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली भारतीय बॉटलिंग युनिट ‘हिंदुस्तान कोका-कोला बेवरेजेज’ (HCCB) चा आयपीओ (IPO) आणण्याच्या विचारात असून, याद्वारे सुमारे १ अब्ज डॉलर (अंदाजे ९,५00 कोटी रुपये) उभारण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोका-कोलाने या आयपीओ प्रक्रियेसाठी नामांकित गुंतवणूक बँकांना सादरीकरण देण्यासाठी आमंत्रित केले असून, पुढील आठवड्यात लंडनमध्ये यावर महत्त्वाची चर्चा होणार आहे. सध्या ‘Rothschild & Co.’ या संपूर्ण प्रक्रियेत कंपनीचे सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
८५,000 कोटी रुपयांच्या व्हॅल्यूएशनची अपेक्षा
रिपोर्ट्सनुसार, कोका-कोला आपल्या भारतीय बॉटलिंग कंपनीचे मूल्यांकन (Valuation) सुमारे १० अब्ज डॉलर (अंदाजे ८५,000 कोटी रुपये) व्हावे, अशी अपेक्षा ठेवून आहे. मात्र, ही योजना अद्याप अत्यंत प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे आयपीओ नेमका कधी येणार, त्याचा अंतिम आकार किती असेल, कंपनीचे अचूक व्हॅल्यूएशन आणि किती शेअर्सची विक्री केली जाईल, यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, या संदर्भात कोका-कोला किंवा रॉथस्चाइल्ड अँड कंपनीने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेकडे ओढा
गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने केलेली विक्रमी घोडदौड आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहून अनेक विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) आपल्या भारतीय उपकंपन्यांना देशांतर्गत बाजारात लिस्ट करत आहेत. गेल्या वर्षी ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स’ने (LG Electronics) आपल्या भारतीय युनिटच्या लिस्टिंगची तयारी सुरू केली होती, तर २०२४ मध्ये ‘ह्युंडई मोटर’ने (Hyundai Motor) भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ३.३ अब्ज डॉलरचा आयपीओ आणून नवा विक्रम रचला होता. आता कोका-कोला देखील याच मार्गावर चालताना दिसत आहे.
किती मोठा आहे HCCB चा विस्तार?
हिंदुस्तान कोका-कोला बेवरेजेज (HCCB) ही भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्ट ड्रिंक बॉटलिंग कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
मुख्यालय: बेंगळुरू
नेटवर्क: देशभरातील १७ लाखांहून (१.७ दशलक्ष) अधिक किरकोळ दुकानांपर्यंत उत्पादनांची पोहोच.
उत्पादन केंद्रे: भारतातील १२ राज्यांमध्ये १४ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स कार्यरत.
वितरण: दक्षिण आणि पश्चिम भारतातील २३६ जिल्ह्यांमध्ये कोका-कोलाच्या पेयांचा पुरवठा.
रोजगार: कंपनीत ५,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.



