Financeअर्थव्यवस्थाउद्योग

1 जुलैपासून मोठे बदल लागू! प्रत्येक नागरिकाने जाणून घ्याच ‘हे’ 5 नवे नियम

Rules Change From 1st July : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम लाखो नागरिकांवर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन खरेदी आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. काही सेवांमध्ये दिलासा मिळणार असला, तरी काही सेवांसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

आधारशी ई-मेल लिंक करणे होणार मोफत
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत आधार कार्डशी ई-मेल आयडी लिंक करण्याची ऑनलाइन सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी 75 शुल्क आकारले जात होते. या निर्णयामुळे लाखो आधारधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पासपोर्ट काढणे होणार महाग
1 जुलैपासून पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे. सुधारित शुल्कानुसार सामान्य पासपोर्ट अर्जाचे शुल्क 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आले आहे. तर तात्काळ (Tatkal) पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना आता 3,500 रुपयांऐवजी 5,000 रुपये शुल्क भरावे लागेल. हे नवे शुल्क नवीन अर्ज तसेच पासपोर्ट नूतनीकरणासाठीही लागू राहणार आहे.

वाहनांच्या किंमती वाढणार
नवीन महिन्यापासून वाहन खरेदी करणेही महाग होणार आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी 1 जुलैपासून विविध मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढत्या उत्पादन खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे प्रवासी वाहनांसह इतर वाहनांच्या किंमती 1.5 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल
1 जुलैपासून अनेक बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर सुविधांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. काही व्यवहारांवर यापुढे रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. तसेच, एअरपोर्ट लाऊंजची मोफत सुविधा मिळवण्यासाठी किमान खर्चाची अट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत प्रत्येक तिमाहीत तीन वेळा मोफत देशांतर्गत लाऊंज सुविधा मिळणाऱ्या ग्राहकांना आता ही सुविधा मिळवण्यासाठी एका तिमाहीत किमान 60,000 रुपये खर्च करणे आवश्यक असेल.

इतर सेवांमध्येही बदल होण्याची शक्यता
1 जुलैपासून आर्थिक आणि ग्राहक सेवांशी संबंधित आणखी काही नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणतीही सेवा घेण्यापूर्वी संबंधित विभाग, बँक किंवा सेवा प्रदात्यांकडून अद्ययावत नियम आणि अटी तपासून घेण्याचा सल्ला ग्राहकांना देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button