Environment

आरेच्या हरित संवर्धनासाठी खासदार रविंद्र वायकरांचा पुढाकार; ५०० हून अधिक वृक्षांचे रोपण

मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे कॉलनीत पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने खासदार रविंद्र वायकर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने शनिवारी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत आरे परिसरातील तीन ठिकाणी ५०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. तसेच १४ ऑगस्ट रोजी आणखी १,००० पेक्षा अधिक झाडे लावण्याचा संकल्पही जाहीर करण्यात आला.

आरे परिसरात ५०० हून अधिक वृक्षांची लागवड

वृक्षारोपण मोहिमेत जांभूळ, आंबा, चिकू, सप्तपर्णी, पुत्रजीवा आणि ताम्हण यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या उद्यान विभाग आणि आरे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

अधिकारी, सामाजिक संस्था आणि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपूरकर, उद्यान विभागाचे अधिकारी निलेश धनावडे, निलेखा पाटील यांच्यासह शिवसेनेचे उपनेते दिलीप शिंदे, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, प्रमिला शिंदे, मनीषा वायकर, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, आत्माराम चाचे, शाखाप्रमुख बाळकृष्ण जोशी, राजन राणे, हुसेन करोडी, पूजा शिंदे, क्षमा काळसेकर, डॉ. सावंत, डॉ. काटे, डॉ. राहुल महाले, सुमित पवार, बाबू धामापूरकर, मनोज सातारकर, स्वप्नील सुर्वे, शिवसेना पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

‘आरेचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी’ – खासदार रविंद्र वायकर

खासदार रविंद्र वायकर म्हणाले की, “आरे ही केवळ मुंबईची शान नसून मुंबईकरांना शुद्ध हवा देणारा महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ झाडे लावून थांबणे पुरेसे नाही, तर त्यांचे संवर्धन आणि जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरे प्रशासन यांच्या समन्वयातून हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल.”

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आणखी मोठे अभियान

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी आरेमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात १,००० हून अधिक झाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, मुंबईतील हरित पट्टा वाढविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याचे खासदार रविंद्र वायकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button