Maharashtra Govमुंबई

1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ

मुंबई : मुंबईकरांना १ ऑक्टोबरपासून टोलचा झटका बसणार आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात ५ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे दर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असतील.

मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके  आहेत. महानगर प्रदेशातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च सन २००२ ते २०२७ अशा २५ वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके  उभारण्यात आले असून राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत असून कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर ४० रुपये होईल. मिनी बस, १२ ते २० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ६५ रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात १०५ वरून १३० अशी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल १३५ रुपयांवरून १६० रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

टोलचे नवे दर

* छोटी वाहने – ४० रुपये

* मध्यम अवजड वाहने – ६५ रुपये

* ट्रक आणि बसेस – १३० रुपये

* अवजड वाहने – १६० रुपये

* हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे.

* पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button