Mumbai Water Crisis : दहिसर वनजमिनीवर धरण उभारणार? विधान परिषदेत प्रवीण दरेकरांचा सरकारला थेट सवाल
Mumbai Water Crisis : मुंबईच्या वाढत्या पाणीटंचाईचा मुद्द विधान परिषदेत जोरदार गाजला. भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दहिसर चेकनाक्याजवळील वनजमिनीवर धरण उभारण्याचा प्रस्ताव मांडत सरकारला थेट प्रश्न विचारला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह पाण्याची वाढती गरज लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले.
दहिसरमध्ये धरण उभारण्याची मागणी
लक्षवेधी चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी दहिसर चेकनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वनजमीन उपलब्ध असल्याचे सांगितले. या ठिकाणी धरण उभारण्याची शक्यता तपासून सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी नगरविकास, वन विभाग आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण करून व्यवहार्यता तपासावी, असेही त्यांनी सुचवले.
मुंबईतील पाणीवाटपातील विसंगतीवर दरेकरांचे बोट
मुंबईत उंच इमारती आणि नव्या टॉवर्सना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना टेकड्यांवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब दरेकर यांनी उपस्थित केली. नव्या गृहप्रकल्पांना परवानगी देताना त्या भागातील उपलब्ध पाणी आणि स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या परिणामाचा पुरेसा अभ्यास केला जातो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वनजमिनीवरील धरणाबाबत सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी माधव चितळे समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. दहिसर परिसरातील वनजमिनीवर धरण उभारण्यापूर्वी सविस्तर सर्वेक्षण, तांत्रिक पडताळणी आणि वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अनधिकृत नळजोडण्यांवरही कारवाईचे संकेत
मुंबईतील भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका विविध पर्यायांवर काम करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. शहरातील अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



