Politicsराजकारण

तोंड लपवायची वेळ आल्याने नितीन राऊत सांगत आहेत चूक आकडेवारी; फडणवीस यांचा आरोप

मुंबई: ‘राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्याने ते चूक आकडेवारी सांगत आहेत’, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले – आमचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात ‘स्टेट युटिलिटी’ मजबूत झाली.

त्याच्या आधी परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात त्याची परिस्थिती काय होती ही आकडेवारी बावनकुळेंनी प्रसिद्ध केली आहे. आपले अपयश लपवण्याकरिता कधी केंद्राकडे बोट दाखवायचे, तर कधी आधीच्या सरकारकडे बोट दाखवायचे, असे चालले आहे. तुमच्यात ताकद असेल तर वीज बिल माफीची घोषणा करा, नाही तर घोषणा करू नका, असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.

या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटनंतर वीज बिलात सूट देण्याचा निर्णय घेतला, असे मंत्र्यांनी सांगितले आणि स्वत:ची होर्डिंग्ज लावून घेतली. बावनकुळे यांच्या काळात वीज विभाग मजबूत झाला. आम्ही वीज बिले दाखवून लोकांचे झालेले हालही दाखवले, असे फडणवीस म्हणालेत.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तत्कालीन भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले. कोरोना काळात वीज बिले भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी नऊ  हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये ५९,१०२ कोटींवर पोहचली. मार्च २०२० ला घरगुती ग्राहकांकडे असलेली १३७४ कोटींची थकबाकी ही ४८२४ कोटींवर गेली. वाणिज्य ग्राहकांची ८७९ वरून १२४१ कोटींवर तर औद्योगिकची ४७२ वरून ९८२ कोटींवर पोहचली. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वांत  मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे.

भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहचली, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करून दिली. ऊर्जामंंत्र्यांनी कालच सर्वसामान्यांना वीज बिल माफी मिळणार नाही, असे सांगितले. ‘लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं  भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता राहिला नाही.’ असे नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितले. वापरापेक्षा जास्तची बिले आली असतील त्याची चौकशी सुरू आहे; पण ज्यांनी वीज वापरली आहे, त्यांना बिल भरावे लागेल, असे नितीन राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button