TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ; दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
TET Paper Leak : राज्यातील लाखो भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना पेपरफुटीच्या प्रकारामुळे रद्द करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरातील पाच लाखांहून अधिक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.
टीईटी पेपरफुटीची SIT मार्फत चौकशी
टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ठाण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून या प्रकरणातील तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. दोषींना कोणतीही सवलत देऊ नये आणि या रॅकेटमागील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशीही चर्चा केली. पेपरफुटी प्रकरणातील घडामोडींचा आढावा घेत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
पाच लाखांहून अधिक उमेदवारांना फटका
पेपरफुटीमुळे रविवारी होणारी टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभरातील पाच लाखांपेक्षा अधिक उमेदवारांचे नियोजन विस्कळीत झाले असून, त्यांच्या भवितव्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
टीईटी परीक्षा रद्दच करा
या घटनेनंतर शिक्षक महासंघाने टीईटी परीक्षेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दैनंदिन अध्यापन आणि टीईटी परीक्षेचा थेट संबंध नसल्याचे सांगत ही परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्यांबाबतही नाराजी
अनिल बोरनारे यांनी शिक्षकांवर बीएलओसह विविध अशैक्षणिक जबाबदाऱ्या टाकल्या जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. शिक्षक आधीच अतिरिक्त कामांमुळे त्रस्त असून, या प्रश्नांसह टीईटीबाबतची भूमिका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



