Farmers Loan Waiver : 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जुलैपासून सुरू होणार कर्जमाफीची प्रक्रिया
Farmers Loan Waiver : राज्यातील लाखो शेतकरी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची आतुरतेने वाट पाहत होते. याच योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर हा निर्णय राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ लागू केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
खात्यात जमा होणार कर्जमाफीची रक्कम
राज्य सरकारच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमुक्ती योजनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या योजनेसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जदारांची माहिती जमा करण्यात आली आहे. याबद्दल अंतिम पडताळणी सुरू आहे. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये शासनाकडून थेट कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
योजनेचे तीन महत्त्वाचे लाभ
या योजनेत विविध प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार करून तीन स्वतंत्र लाभ निश्चित करण्यात आले आहेत.
२ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी : पात्र थकीत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
वन टाइम सेटलमेंट (OTS) योजना : दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता योजना’ लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर उर्वरित कर्जमाफीची रक्कम शासन थेट कर्जखात्यात जमा करणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन : प्रतिकूल परिस्थितीतही वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने **५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
डिजिटल प्रक्रियेमुळे कर्जमाफी अधिक पारदर्शक
कर्जमाफी प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा गैरव्यवहार होऊ नये यासाठी राज्य शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि आधार क्रमांकावर आधारित केली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांची माहिती थेट पोर्टलवर अपलोड केली जात असून संगणकीय पडताळणीनंतर अंतिम लाभार्थी यादी तयार केली जात आहे. सदर यादी ग्रामपंचायत, गाव चावडी, बँक शाखा, विकास संस्था तसेच ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही माहिती दिली जाणार आहे.
लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डचे व्हेरिफिकेशन आवश्यक
कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर आधार क्रमांक किंवा लाभार्थी क्रमांकासह ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा संबंधित बँकेत जाऊन बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा केली जाईल.दरम्यान, वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम स्वतःचा हिस्सा जमा करणे बंधनकारक असून त्यानंतरच शासनाकडून उर्वरित कर्जमाफीचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.



