तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! शेगावातील प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील कठोर मोहिमेनंतर आता हॉटेल्स, प्रसाद विक्रेते आणि मोठ्या कंपन्यांच्या गोदामांवरही FDA ने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. शेगावातील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर कारवाई केली. यानंतर भिवंडीतील अमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर टाकलेल्या धाडीमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड
देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येणाऱ्या शेगावातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळीची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील FDA पथकाने मंदिर परिसरातील प्रसाद आणि पेढे विक्रेत्यांच्या दुकानांवर अचानक धाड टाकत गोड पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
मंदिर परिसरातील विक्रेत्यांमध्ये भीती
या कारवाईनंतर शेगावातील प्रसाद विक्रेते, पेढे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, पाणीपुरी स्टॉल्स तसेच इतर उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या व्यवसायात कोणतीही भेसळ होणार नाही आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होईल, यासाठी अनेकांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
भिवंडीत अमेझॉन रिटेलच्या गोदामावर मोठी कारवाई
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सरवली येथे असलेल्या Amazon Retail India च्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली. मुदतबाह्य आणि आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली.या कारवाईत अमेझॉन रिटेल इंडियाच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोन जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक्सपायरी डेट असणारे फूड्स पुन्हा बाजारात
FDA च्या प्राथमिक तपासात ‘अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’ आणि ‘आर. के. ट्रेडर्स’ यांच्या संगनमताने एक्सपायरी डेट असणारे फूड्स नष्ट न करता ते पुन्हा अन्नसाखळीत पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईनंतर इतर गोदामे आणि अन्न वितरण कंपन्यांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.



