Digital Mediaजळगाव (Jalgaon)सोशल मीडिया

वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावले; नक्की प्रकरण काय आहे?

जळगाव: जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या व्यक्तींनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. संघटनांकडे या महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. गृहमंत्र्यांच्या आदेशानतंर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमून त्यांच्याकडून या घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला व बाल कल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी वसतिगृहात भेट दिली.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते फिरोज पिंजारी यांनी म्हटलं की, “आम्ही एका वेगळ्या कामासाठी या वसतीगृहावर गेलो, आणि तिथे आमचं दुसरं मॅटर चालू होतं, एका मुलीला घरी घेऊन जाण्याचं. तर तिथे गेल्यावर मुली आरडाओरडा करायला लागल्या, की आम्ही इथे अडकलो आहोत, आमचं शोषण चालू आहे. आम्हाला घेऊन जा. आम्हाला या मुलींनी हेही सांगितलं की आम्हाला इथे अक्षरशः कपडे काढून नाचवलं जातं. आम्हाला वसतीगृहात येऊ दिलं जात नव्हतं तर लांबूनच आम्ही व्हीडिओ काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना दाखवला.”

ज्या व्हीडिओत या वसतीगृहातल्या मुली आपल्याला कपडे काढून नाचयला लावलं असा आरोप करत आहेत तो व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या मुलीचा चेहरा दिसत नाही. ती ओरडून म्हणते की, “कपडे काढून अक्षरशः नाचायला लावलं आहे आम्हाला. जेवण पण असं देत आहेत की सांगता येत नाही. सरकारकडून रेशन येत त्याला लॉक लावून ठेवतात आणि आम्हाला खायला देत नाहीत. मुलींकडून पैसा घेतात आणि त्यांच्या बॉयफ्रेंडला फोन लावून देतात हे.”

या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता. या महिलांच्या तक्रारीनुसार १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याचे सांगितले. तसेच ज्या मुली विरोध दर्शवतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी देत असल्याच्या तक्रारी देखील येथील महिला करीत होत्या. त्या खिडकीतून तक्रारी करीत असल्याचा व्हिडिओ काही पदाधिकाऱ्यांनी तयार केला. या वसतिगृहातील दोघा महिलांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. तसेच यातील एका महिलेनेच या तक्रारी केल्याचे समोर येत आहे.

दुसरीकडे वसतीगृहाच्या ज्या महिला अधिकाऱ्यांवर या मुलीने आरोप केले आहेत त्या रंजना झोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “संस्थेत कोणत्याही प्रकारचं गैरप्रकार होत नाहीत. ज्या मुलीचा व्हीडिओ व्हायरल झाला, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, तिने आधीही गरोदर मुलींना मारहाण केलेली आहे. ज्यांनी आमच्यावर हे आरोप केलेत त्यांना याआधी आम्ही वसतीगृहात प्रवेश दिला नव्हता म्हणून हा प्रकार मुद्दाम घडवून आणला आहे.”

जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनीही म्हटलंय की, “माहिती मिळताच आम्ही तातडीने भेट दिली. त्या मुलीशीही आम्ही चर्चा केली. त्या मुलीने एका व्यक्तीला जे सांगण्याचा प्रयत्न केलाय तसं काहीही झालेलं नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केलेली आहे.”

पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मूंडे यांनी सांगितले की, आशादीप वसतिगृहातील प्रकाराची वरिष्ठ महिला अधिकारी चौकशी करीत आहेत. जी महिला व्हिडिओत सांगते आहे, ते नेमके कोणाबद्दल ते कळत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. चौकशीत जे समोर येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. तसेच या प्रकरणाची वरिष्ठांनाही माहिती दिली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानतंर लगेचच तहसीलदारांसह या ठिकाणी भेट देवून चौकशी केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेसी यांनी दिली. तसेच या ठिकाणी दोन महिलांचा वाद झाला होता. त्यातील एका महिलेने याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. दरम्यान असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एका समितीकडून याबाबत चौकशी केली जात आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही परदेसी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button