डिजिटल महाराष्ट्र वार्ता

जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; सुनेत्रा पवारांची रुग्णालयात भेट, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-बेलसर मार्गावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हळहळले आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सुनेत्रा पवारांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट

अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली आणि सर्व रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

📍 जेजुरी, पुणे
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे म्हटले आहे. अपघातातील मृत ३ वारकरी भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या… pic.twitter.com/e9KCl6EIKY— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 13, 2026

मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तीन वारकरी भगिनींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताला अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातातील ३ वारकऱ्यांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने…— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 13, 2026

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाचे आवाहन

सुनेत्रा पवार यांनी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. वाहनचालकांनी विशेष दक्षता घेऊन वाहने चालवावीत आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Back to top button