महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार ठाम; मराठी बांधवांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानभवन येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. तसेच सीमावादासंदर्भातील विविध मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांची नियुक्ती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची सुनावणी लवकर सुरू व्हावी यासाठी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच कर्नाटकमधील मराठी बांधवांवर दाखल करण्यात आलेल्या विविध खटल्यांमध्ये त्यांना सक्षम कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठीही राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी’- मुख्यमंत्री फडणवीस
सीमाभागातील मराठी भाषिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. उच्चाधिकार समितीने मांडलेल्या सर्व सूचना आणि प्रलंबित मुद्द्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
संसदेतही विषय मांडण्याची तयारी
भाषिक अल्पसंख्याक आयोगाशी संबंधित सर्व माहिती संकलित करून ती महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पाठविण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडता येईल आणि मराठी भाषिकांच्या प्रश्नांकडे राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले जाईल, असे त्यांनी सांगितले.
Strengthening Support for Marathi-Speaking People in the Border Areas!
Chaired a meeting of the high-powered committee on the Maharashtra-Karnataka border issue at Vidhan Bhavan in Mumbai today.
Maharashtra Government stands firmly with the Marathi-speaking people living in the… https://t.co/GkISdPvqbC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंचीही ग्वाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र शासन संवेदनशील असल्याचे सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी जनतेच्या न्याय्य मागण्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत अनेक मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ यांच्यासह विविध पक्षांचे आमदार आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.सीमावादासंदर्भात एकत्रित भूमिका घेऊन मराठी भाषिकांच्या हितासाठी पुढील रणनीती ठरविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.



