आषाढी वारीला आजपासून सुरुवात! देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान; मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज (मंगळवार, ७ जुलै) देहूतून प्रारंभ होत आहे. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. तरी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. देहू, आळंदी आणि पैठण येथे पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विठुरायाच्या भेटीसाठी दिंड्यांचे प्रस्थान सुरू झाले आहे.
देहूतून आज संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
देहू येथील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या वारीसाठी प्रथमच नवीन पालखी रथ तयार करण्यात आला असून, भरपावसात त्याची मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे नदीकिनारी बॅरिकेडिंग करण्यात आले असून, वारकऱ्यांना नदीपात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
आळंदीत मर्यादित स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा
मुसळधार पावसामुळे आळंदीतील परिस्थिती गंभीर असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात पार पडणार आहे. नवीन रथ अर्पण सोहळा पावसामुळे स्थगित करण्यात आला असून, मंदिर परिसरात केवळ वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलीस आणि अधिकृत व्यक्तींसह सुमारे १,६६० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळापत्रक
पहाटे ५.०० – श्रींची व शिळा मंदिर महापूजा
पहाटे ५.३० – तपोनिधी नारायण महाराज समाधी पूजा
सकाळी ९.०० – पादुका महापूजा (इनामदार वाडा)
सकाळी १०.०० – काल्याचे कीर्तन
दुपारी २.३० – पालखी प्रस्थान
सायंकाळी ५.०० – मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी ६.०० – समाजआरती व मुक्काम (इनामदार वाडा)
पैठणहून संत एकनाथ महाराज पालखीही आज मार्गस्थ
श्री क्षेत्र पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचेही आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दुपारी १२ वाजता नाथ मंदिरातून पालखी निघणार असून, सायंकाळी साडेसहा वाजता ती चनकवाडीकडे रवाना होईल. जिल्ह्यासह विविध भागांतील दिंड्या आणि हजारो वारकरी पैठणमध्ये दाखल झाले असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडणार आहे.
प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी आणि भाविकांना नदीपात्र, घाट परिसर आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे वारीत सहभागी व्हावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



