Maharashtra Govऑटोमोबाईल

HSRP नसलेल्या वाहनधारकांवर सरकारची कडक भूमिका; 1 जुलैपासून राज्यभर कारवाई सुरू

HSRP Number Plate : महाराष्ट्रातील लाखो वाहनधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर असणाऱ्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. 30 जून ही त्यासाठीची अंतिम मुदत आहे. ही मुदत संपल्यानंतर म्हणजेच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई सुरू होणार आहे. केवळ 1,000 रुपयांचा दंडच नाही, तर RTO कडून मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सेवाही बंद करण्यात येणार आहेत.

1 जुलैपासून दंडात्मक कारवाई
राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही वाहनधारकाला मुदतवाढ किंवा विशेष सवलत मिळणार नाही. HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार 1,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. राज्यातील सुमारे 2.10 कोटी पात्र वाहनांपैकी अवघ्या 51 टक्के वाहनांवरच HSRP बसवण्यात आली असल्याने आता नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

HSRP नसल्यास RTO च्या महत्त्वाच्या सेवांवर बंदी
HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना केवळ दंड भरून चालणार नाही. अशा वाहनांसाठी RTO च्या अनेक महत्त्वाच्या सेवा तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण (Ownership Transfer), पत्ता बदल, हायपोथिकेशन अपडेट, वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration), वाहनातील बदलांची नोंद आणि ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू यांचा समावेश आहे. मात्र, फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करणे हे या नियमातून वगळण्यात आले आहे.

अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांना मिळणार दिलासा
ज्या वाहनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत HSRP बसवण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट निश्चित केली आहे, त्यांच्यावर 1 जुलैपासून तात्काळ कारवाई केली जाणार नाही. त्यांच्या अर्जाचा विचार करून त्यांना तात्पुरता दिलासा दिला जाणार आहे. राज्य सरकारने HSRP बसवण्याची जबाबदारी Rosmerta Technologies Limited, Real Industries Limited आणि FTA HSRP Solutions Private Limited या तीन अधिकृत कंपन्यांकडे सोपवली असून संपूर्ण महाराष्ट्र तीन कार्यक्षेत्रांमध्ये विभागण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button