मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये भीती; खासदार रविंद्र वायकरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व येथील हनुमान टेकडी परिसरात संरक्षण भिंतीचा मोठा भाग कोसळल्याची घटना घडली. लक्ष्मण मुद्रा चाळ, माणिक रेडका चाळ, श्री हनुमान सेवा मंडळ, सच्चिदानंद सोसायटी, रहेजा कॉम्प्लेक्स आणि तानाजी नगर परिसराला या घटनेचा फटका बसला आहे. संरक्षण भिंत कोसळल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण झाला असून, आणखी भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खासदार रविंद्र वायकर यांनी केली घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच खासदार रविंद्र वायकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी कोसळलेल्या संरक्षण भिंतीची प्रत्यक्ष पाहणी करत स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त रुपाली सरमळकर-शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या दहा कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास मदत करावी तसेच त्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या.
म्हाडाला तातडीने पुनर्बांधणीचे निर्देश
पाहणीदरम्यान खासदार वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना कोणताही विलंब न करता कोसळलेल्या संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याचवेळी नारळ फोडून संरक्षण भिंतीच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील धोकादायक ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
🚩 मालाडमधील कोसळलेल्या संरक्षण भिंतीची तातडीने पाहणी; म्हाडा अधिकाऱ्यांना नवीन भिंत उभारण्याचे तर पालिकेला रहिवाशांच्या सुरक्षित स्थलांतराचे स्पष्ट निर्देश! 🚩
मालाड (पूर्व) : तानाजी नगर, श्री हनुमान सेवा मंडळ व सच्चिदानंद सोसायटी परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे… pic.twitter.com/jS7EDByEmb— Ravindra Waikar (@RavindraWaikar) July 7, 2026
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही” – रविंद्र वायकर
यावेळी खासदार रविंद्र वायकर म्हणाले, “नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम तातडीने पूर्ण करून परिसर सुरक्षित करणे ही संबंधित यंत्रणांची प्राथमिक जबाबदारी आहे.”
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले समाधान
घटनेनंतर खासदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याबद्दल आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे संरक्षण भिंतीच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती मिळेल आणि परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात विभागप्रमुख वैभव भरडकर, शरद वाघ, राजेश सावरकर, विजय नाईक, गणेश माने, गजेंद्र धरणे तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



