फोनवर बोलण्यापेक्षा मेसेज का पसंत करते Gen Z पिढी? जाणून घ्या ‘टेलिफोबिया’ म्हणजे नेमकं काय
एकेकाळी कोणत्याही महत्त्वाच्या संवादासाठी फोन कॉल हा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह पर्याय मानला जात होता. मात्र, आजची Gen Z पिढी फोनवर बोलण्यापेक्षा व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर किंवा ई-मेलद्वारे संवाद साधणे अधिक पसंत करते. अनेक तरुण फोन येताच तो उचलण्याऐवजी आधी मेसेज करतात. या बदलामागे केवळ डिजिटल सवय नाही, तर ‘टेलिफोबिया (Telephobia) नावाचे मानसिक कारणही असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
टेलिफोबिया म्हणजे नेमकं काय?
टेलिफोबिया म्हणजे फोनवर बोलण्याची भीती, तणाव किंवा अस्वस्थता. अशा व्यक्तींना फोनवर संभाषण करताना घाबरल्यासारखे वाटते. विशेषतः अनोळखी व्यक्तींशी बोलताना किंवा समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यावर कशी प्रतिक्रिया देईल, याची सतत चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे फोन करण्याऐवजी किंवा कॉल उचलण्याऐवजी ते आधी मेसेज पाठवणे अधिक सुरक्षित मानतात.
संशोधनातून काय समोर आलं?
National Institutes of Health (NIH मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये टेलिफोबियाचे प्रमाण लक्षणीय आहे. सततचा ताण, अपुरी झोप, अभ्यासाचा ताण आणि कामाचा दबाव यामुळे अनेकांसाठी फोनची रिंगसुद्धा मानसिक तणावाचे कारण ठरते. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो.
Gen Z ला टेक्स्टिंगच का आवडते?
आजची तरुण पिढी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चॅटिंग करणे हेच नैसर्गिक संवादाचे माध्यम बनले आहे.टेक्स्ट मेसेजिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्तर देण्यासाठी वेळ मिळतो. समोरच्याला काय उत्तर द्यायचे, हे विचार करून लिहिता येते. पण फोन कॉलमध्ये लगेच प्रतिक्रिया द्यावी लागते. अनेक तरुणांसाठी हाच तणावाचा मुख्य मुद्दा ठरतो.
फोन कॉलची भीती का वाटते?
मानसशास्त्रज्ञांच्या मते, फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीचे हावभाव किंवा चेहऱ्यावरील प्रतिक्रिया दिसत नाहीत. त्यामुळे आपले बोलणे चुकीचे समजले जाईल का, आपण काही चुकीचे बोलू का, अशी भीती अनेकांना वाटते.याशिवाय अचानक आलेला फोन कॉल अनेकांसाठी अनपेक्षित तणाव निर्माण करतो. म्हणूनच अनेक तरुण कॉल उचलण्याऐवजी आधी “काय काम आहे?” असा मेसेज पाठवणे पसंत करतात.
सोशल मीडियाने बदलली संवादाची पद्धत
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्ममुळे संवादाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आज लोक छोटे मेसेज, व्हॉईस नोट्स, इमोजी आणि रिअॅक्शनद्वारे सहज संवाद साधतात. हळूहळू फोन कॉलचे प्रमाण कमी झाले आणि चॅटिंग हा संवादाचा मुख्य मार्ग बनला. त्यामुळे अनेक तरुणांना प्रत्यक्ष फोनवर बोलण्याची सवयच उरलेली नाही.
टेलिफोबियावर मात कशी कराल?
फोनवर बोलण्याची भीती कमी करण्यासाठी काही सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात.
- फोनवर लहान संवादापासून सुरुवात करा.
- महत्त्वाच्या गोष्टी आधी लिहून ठेवा.
- फोन करण्यापूर्वी काही वेळ शांतपणे दीर्घ श्वास घ्या.
- कुटुंबीय किंवा मित्रांसोबत नियमित फोनवर बोलण्याचा सराव करा.
- प्रत्येक फोन कॉल परिपूर्णच झाला पाहिजे, असा स्वतःवर अनावश्यक दबाव टाकू नका.



