Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर कायम! नाशिकसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रभरात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे घाटमाथा परिसरातही अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करत नाशिकसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी या तालुक्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीवर
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असून जिल्ह्यातील तब्बल 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पुरसदृश परिस्थितीमुळे प्रशासनाने तीन राज्य महामार्गही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
नाशिक शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसरात महापालिकेने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असून नदीकाठच्या नागरिकांनी आणि भाविकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



