महाराष्ट्रातील पावसाचा नवा अंदाज; कुठे मुसळधार पाऊस, कुठे मिळणार दिलासा?
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मान्सूनचा जोर आता काहीसा कमी होताना दिसत आहे. जून महिन्यात होणाऱ्या पावसाइतका पाऊस केवळ 1 ते 6 जुलैदरम्यान कोसळल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आता भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र, पुण्याच्या घाटमाथ्यावर आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळले
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ढगफुटीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाने आवश्यक तयारी केली होती. वातावरणातील बदलामुळे पावसाचे ढग पालघरमार्गे गुजरातच्या दिशेने सरकले गेले आहेत. यामुळे नाशिकवरील मोठे संकट टळल्याचे चित्र आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे आजही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे घाटमाथा आणि साताऱ्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा
दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला झाला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसर आणि सातारा जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून मोठा विसर्ग
सात ते आठ दिवस सतत पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी धरणातून सुमारे 27 हजार क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून एकता नगर सोसायटीसह काही भागांत पाणी शिरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुंबईत पावसाला विश्रांती
सलग चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाच मिनिटे उशिराने सुरू आहे. तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वरळी गावासह अनेक भागांत पाणी साचले होते, मात्र सकाळपासून परिस्थिती सुधारू लागली आहे.
कोकण आणि विदर्भातही पावसाची शक्यता
रायगड, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील काही तासांत पावसाची शक्यता कायम आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशभरात मान्सूनचा विस्तार वेगाने
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरातमार्गे अरबी समुद्रातून मान्सून आता राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता असून, उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.



